मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच ओमीक्रॉनच्या रूग्णसंख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. हीच परिस्थिती असल्यामुळे हरियाणा, पश्चिम बंगालमध्येही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. महाराष्ट्र रुग्णसंख्येत अग्रस्थानी असल्यामुळे राज्यात मिनी लॉकडाऊन की लॉकडाऊन याबद्दल आज मुंबईत निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. त्यातच हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील १३ मंत्री आणि जवळपास ७० आमदार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नागरीकदेखील नियमाचे पालन करत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आणखी कडक निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता आठवड्यात शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन करण्याचा सरकारचा विचार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य मंत्री, टास्क फोर्स आणि प्रशासकीय यंत्रणा यांची बैठक आज होण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Corona Breaking : राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन..? आज निर्णयाची शक्यता
