पुणे : प्रतिनिधी
राज्यात ओमीक्रॉन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाने शनिवारी रात्रीपासून नवे निर्बंध लागू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता पुणे जिल्ह्यातही नवीन निर्बंध लागू करण्यात येणार असून त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढले आहेत.
ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. पुढील धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने काही नवीन निर्बंध लागू केले आहेत. पुणे जिल्ह्यातही नव्याने काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नवीन नियमांबाबत आदेश पारित केले आहेत.
असे असतील नवीन नियम
नवीन नियमांनुसार लग्न समारंभाला बंद जागेत १०० लोक आणि मोकळ्या जागेत २५० लोक उपस्थित राहू शकतील. तेसच जिम, रेस्टॉरंट, स्पा, हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांना केवळ १०० लोकच उपस्थित राहू शकतात.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवून येवू घातलेल्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.