पुणे : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मंतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर संपूर्ण मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स पुण्यातील कोरेगाव पार्क येथील गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. आज अचानक या गोदामातील सीसीटीव्ही बंद पडल्याची बातमी समोर आली. मात्र काहीच वेळात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या विषयावर पडदा पडला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया ७ मे रोजी पार पडली. या सर्व ईव्हीएम मशीन्स पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. आज सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबीया यांनी या गोदामातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडल्याचा आरोप केला. त्यावरून बराच गदारोळही झाला. आरोप-प्रत्यारोपही झाले, अनेक शंका-कुशंका उपस्थित झाल्या. मात्र काही वेळातच या विषयावर पडदा पडला आहे.
प्रत्यक्षात या गोदामातील सीसीटीव्ही यंत्रणा चालूच होती अशी माहिती समोर आली आहे. केवळ तांत्रिक कारणास्तव स्क्रीनशी जोडलेली वायर काही वेळासाठी काढण्यात आली होती. त्यामुळे हे चित्रीकरण स्क्रीनवर दिसत नव्हते. वास्तविक सलग चित्रीकरण झाले असून आता ती यंत्रणा पूर्ववत झाल्याचे स्पष्टीकरण बारामती लोकसभा मंतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी याबाबत दिले.
हे तर पराभवाचं कारण..!
दरम्यान, या घटनेनंतर प्रतिस्पर्धी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप झाले. तक्रारदार लक्ष्मीकांत खाबीया यांनी तर काही काळंबेरं तर नाही ना असा सवाल उपस्थित केला. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनीच स्पष्टीकरण दिल्यामुळे हा विषय तूर्तास संपला आहे. मात्र असं असलं तरी हे पराभवाचं कारण शोधण्यात आलं असून रोहित पवारांना स्ट्रॉंग रूममधील माहिती मिळतेच कशी अशी मागणी करत रोहित पवार आणि त्यांचे समर्थक ईव्हीएम मशिनसोबत छेडछाड करत नाहीत ना याचीही चौकशी करावी असं राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.