पुणे : प्रतिनिधी
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १६ सप्टेंबर रोजी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.
आतापर्यंत कलेची सेवा केली आहे. आता राजकारणात जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळेच १६ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुरेखा पुणेकर यांनी सांगितले.
सुरेखा पुणेकर यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत अनेकदा चर्चा झडल्या आहेत. त्या पुण्यातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा होत्या. आता मात्र त्यांनी आपण राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. गुरुवार दि. १६ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडेल.