मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा नविन घातक व्हेरियंट समोर आलेला आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी राज्यासह देशभरात कडक पावले उचलण्यात येत आहेत. त्यातच येत्या दोन दिवसात राज्यातील प्राथमिक शाळा सुरू होणार आहेत. पण कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. त्यामुळे यानंतर शाळा सुरू होणार की नाही यावर संभ्रम निर्माण झालेला आहे.यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ठरल्याप्रमाणे १ डिसेंबरला सुरू होणार असल्याचे आता स्पष्ट केले आहे.
शाळांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दोन व्यक्तीमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. तर मास्क वापरणे बंधनकारक आहे. हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षण-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पुर्ण असणं बंधनकारक असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल असलेल्या या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन – Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने ‘Variant of Concern’ म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे.
या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णय “भयावह” विषाणू असं केलं आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वात वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.