
सातारा : प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर महामार्गावरून पुण्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बसने अचानक पेट घेतला. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे बस थांबवून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अचानक लागलेल्या या आगीत ही बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. सातारा शहरानजीक आनेवाडी टोलनाका परिसरात ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, आज सकाळी ही बस कोल्हापूरहून पुण्याला जात होती. साताऱ्यापासून जवळच असलेल्या आनेवाडी टोलनाक्याजवळ या बसने अचानक पेट घेतला. ही बाब लक्षात येताच चालक आणि वाहकाने तात्काळ बस थांबवत प्रवाशांना खाली उतरवले. या दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत पोलिसांसह सातारा नगरपरिषद आणि भुईंज कारखान्याच्या अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत बस संपूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडली होती. परिसरात आगीचे लोट पसरले होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्काळ दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.