
जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने २४ डिसेंबर ही तारीख दिलेली आहे. त्यामुळे आज आंतरवाली सराटी येथे आयोजित बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार होती. मात्र आता पुढील आंदोलनाबाबत २३ डिसेंबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत निर्णय घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारकडून उद्या अधिवेशनात भूमिका मांडली जाणार आहे. त्यामुळे आताच आंदोलनाचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. राज्यभरातील दौऱ्यानंतर आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार होती. मात्र आता २३ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात होत असलेल्या सभेत आंदोलनाचा निर्णय जाहीर करू असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे सरकारची भूमिका आधी कळली पाहिजे. त्यानंतरच मराठा समाजाची आंदोलनाची दिशा ठरवणे योग्य राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम आहेत. तसा निरोपही सरकारकडून मिळालेला आहे. त्यामुळे आपण काय आंदोलन करणार हे आताच सरकारला कळेल. तसं न करता त्यांची भूमिका काय आहे हे लक्षात घेऊन मग पुढील निर्णय घेऊ असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारला दिलेली जी मुदत आहे त्यात एक तासही वाढवणार नाही. आता मराठा समाज मागे फिरणार नाही. हा लढा ताकदीने आणि युक्तीने लढायचा आहे. त्यामुळे आधी सरकारला भूमिका जाहीर करू द्या, त्यानंतर बीड जिल्ह्यात २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत आपल्या आंदोलनाची दिशा ठरवू असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.