
मुंबई : प्रतिनिधी
लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण पुढील ३० दिवस बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. आज सायंकाळी ६ वाजल्यापासून प्रक्षेपण बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पुढील ३० दिवसांसाठी या वृत्तवाहिनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी लोकशाही वृत्तवाहिनीने एक बातमी प्रसारीत केली होती. त्यानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने या वाहिनीला नोटीस काढत तीन दिवस प्रसारण बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागण्यात आली होती. त्यावेळी या वाहिनीवरील बंदी उठवण्यात आली होती. परंतु आज पुन्हा अचानकपणे ही वाहिनी बंद ठेवण्याचा आणि परवाना रद्द केल्याचा निर्णय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिला आहे.
२६ जानेवारी रोजी या वृत्तवाहिनीचा वर्धापनदिन होत आहे. तत्पूर्वीच हा आदेश आला आहे. दरम्यान, १७ जुलै २०२३ पासून लोकशाही वृत्तवाहिनीने दाखवलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांची एक बातमी दाखवली होती. तेव्हापासून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून विविध कागदपत्रे मागवण्यात आली. त्यानंतर आज अचानक हा निर्णय घेण्यात आला.
आम्हाला खरं बोलण्याची शिक्षा दिली जात असल्याचे सांगत लोकशाही वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचे म्हटले आहे. आम्हाला सातत्याने नोटीसा पाठवल्या गेल्या. आम्ही सत्याच्या बाजूने उभे राहिलो म्हणून आम्हाला या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.