मुंबई : प्रतिनिधी
देशातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आरोग्य विभागाने याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यात लवकरच पुन्हा काही निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा मास्क सक्ती करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कोरोनाचे संभाव्य संकट लक्षात घेऊन गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. राज्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासह अन्य काही उपाययोजना हाती घेतल्या जातील असेही टोपे यांनी स्पष्ट केले.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे सातजण बाधित आढळत आहेत. ओमीक्रॉन या विषाणूचा कोणताही प्रकार महाराष्ट्रात आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या काळात ६ ते १२ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याबाबत शाळा प्रशासन आणि पालकांना विश्वासात घेऊन पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.