
मुंबई : प्रतिनिधी
इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे , अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पुढे ढकलल्या जातील का ? या संदर्भात निवडणूक आयोगाची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या विधेयकाविषयी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली आहे. त्यासंदर्भात मी कायदा सचिव आणि अतिरीक्त मुख्य सचिवांना राज्यपालांच्या भेटीसाठी पाठवले होते. याबाबतच्या सर्व बाबी आम्ही राज्यपालांच्या लक्षात आणून दिल्या असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
या विधेयकाला दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी एका मताने मंजुरी दिली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील आपण मंजूर केलेल्या विधेयकावर जास्त मत व्यक्त केलेले नाही. हा विषय ऐकून घेतल्यानंतर राज्यपालांनी विधेयकावर सही केलेली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी राज्यपालांचे मनापासून आभार मानत धन्यवाद दिले.
त्यासोबतच राज्यातील जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांनी हे विधेयक एकमताने मंजूर केले व राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे राज्यात चांगले वातावरण असल्याबद्दल अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.