पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत आहे. त्यामुळे ते आज ना उद्या सरकारमधून स्वत:चं बाहेर पडतील, असे विधान माजी खासदार संजय काकडे यांनी केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विधानावरून संजय काकडे यांना खोचक टोला लगावला. संजय काकडे यांची विश्वासार्हता पुणेकरांनाच विचारा असे म्हणत अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला.
पुण्यात आज कोरोना आढावा बैठक पार पडल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय काकडे यांच्या उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये घुसमट होत असल्याच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला. तुम्ही पुण्याचे, मीही पुण्याचाच आणि संजय काकडेही पुण्याचेच आहेत. त्यांची विश्वासार्हता किती ही तुम्ही पुणेकरांनाच विचारा अशा शब्दांत अजित पवार यांनी टोला लगावला.
काय म्हणाले होते संजय काकडे..?
मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत, असे विधान संजय काकडे यांनी केले होते.