जळगाव : प्रतिनिधी
पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे.
एकनाथ खडसे लोणावळा येथील बंगला, जळगाव येथील तीन जमिनी आणि तीन फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, बँकेतील ८६ लाखांच्या ठेवीसुद्धा गोठवत तब्बल ५ कोटी ७३ लाखांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी आता योग्य वेळ आली की सीडी लावणार असल्याचा इशारा दिला आहे.
ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो, हे खरे आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच हा अहवाल जाहीर करणार आहे. ईडी चौकशीवर परिणाम होईल, असे आपण बोलणार नाही. परंतु खानदेशातील नेतृत्व संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.