जळगाव : प्रतिनिधी
सुसंस्कृत महाराष्ट्रात नेहमीच महिलांना आदराचं स्थान मिळालं आहे.. मात्र काल पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे आता यापुढे कोणत्याही महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे या सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. जळगाव येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना झालेल्या मारहाणीबद्दल त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आपलं राज्य सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखलं जातं. मात्र काल भाजपच्या कार्यक्रमात महिलांवर हात उचलला जातो ही गंभीर बाब असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कोणत्याही महिलेवर यापुढे कोणी जर हात उचलणार असेल तर आपण न्यायालयात जाऊ. प्रसंगी हात तोडून हातात द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला. हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांचा आहे. इथे महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली जाते. त्यामुळे कोणी जर महिलांबाबत चुकीचं वागणार असेल तर त्याला नक्कीच उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.