पुणे : प्रतिनिधी
धार्मिक स्थळे आणि दारूची दुकाने वगळता राज्यात निर्बंध लागू केले आहेत. मात्र दारूच्या दुकानावर अधिकची गर्दी होत असल्यास नाईलाजाने ती ही बंद करण्यात येतील, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रसार वाढल्याने सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. हॉटेल, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. लग्नाला ५० जणांच्या आणि अंत्यविधीला २० जणांच्या उपस्थितीला मान्यता असेल. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांची उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहे
याच निर्बंधावर विरोधकांनी टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राजेश टोपे म्हणाले, गर्दी झाल्यास दारूची दुकानेही बंद करण्यात येतील. मंदिरे बंद करण्यात आलेली नाहीत. मात्र कोरोना नियमांचे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. राज्यातील ऑक्सिजनची मागणी वाढत नाही आणि त्याचबरोबर दवाखान्यातील बेड कमी पडत नाहीत तोपर्यंत इतर निर्बंध लागू करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.