चंद्रपूर : प्रतिनिधी
त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रातही उमटत आहेत. त्रिपुरा येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ काल अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. याच पार्श्वभूमीवर भाजपने ‘शहर बंद’ची हाक दिले होती. या बंदलाही हिंसक वळण लागले. यावर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून राजकीय लाभ घेण्यासाठी हा बंद आयोजित केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
काल त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून आज सकाळपासूनच ‘अमरावती बंद’ पुकारण्यात आला. मात्र या बंदमध्ये शहरातील राजकमल चौकामध्ये मोठ्या संख्येने लोक गोळा झाले. सकाळपासूनच अमरावतीमध्ये या बंदला हिंसक वळण लागले होते. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
आज पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये अनेक गाड्यांची तोडफोड झाली आहे. अनेक ठिकाणी जाळपोळही झाली आहे. हा ‘बंद’ राजकीय लाभ घेण्यासाठी पाळण्यात आला होता. भाजपाचा फूट पाडणे हा राजकीय अजेंडा आहे, असा आरोप करत नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.