Site icon Aapli Baramati News

BARAMATI BREAKING : मराठा समाज आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी ‘बारामती बंद’; शहरातून मोर्चाही काढणार

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर जालना जिल्ह्यात झालेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. बारामतीतही मराठा समाजाकडून सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी ‘बारामती बंद’ ची हाक देण्यात आली आहे. याच दिवशी बारामती शहरातून मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला जाणार आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरू होते. काल या आंदोलकांची प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असताना अचानकपणे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलकांसह महिलाही जखमी झाल्या आहेत. या घटनेचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत मराठा समाज बांधवांनी बैठक घेत या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी बारामती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज झालेल्या बैठकीत उपस्थितांनी विविध विषयांवर मुद्दे उपस्थित केले. जालन्यातील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांवर कठोर कारवाई होण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. मराठा समाजाने आजवर आरक्षणासाठी शांततेत आंदोलन केले असताना काल अंतरवाली सराटी येथील आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आज झालेल्या बैठकीत सोमवारी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातून मोर्चा काढण्याचेही निश्चित करण्यात आले. त्यानुसार सोमवारी सकाळी ९ वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात केली जाणार आहे. तर भिगवण चौकात या मोर्चाची सांगता होणार आहे. याचवेळी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version