
पुणे : प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह राज्यातील इतर ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा तोंडाला आलेला घास अतिवृष्टीमुळे गेला आहे. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आठवडाभरातच नुकसान भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात कोरोना आढावा बैठकीदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी मिळेल, हे पाहिले जात आहे. शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करण्याविषयी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल. त्यासोबतच पिक विमा कंपन्यांना सूचना केल्या आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्याचे नुकसान होत असताना सत्ताधारी नेते संवाद यात्रेत दंग आहेत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. यावर पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यावेळी अतिवृष्टी चालू होती. त्यावेळी मंत्री मराठवाड्यात होते. अतिवृष्टी झाल्यानंतर लागलीच संबंधित मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केलेली आहे. विरोधकांचे आरोप योग्य नाही. ते करत असलेल्या आरोप खोटे आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.