मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमध्ये रुसवे फुगवे आहेत असे वातावरण विरोधकांकडून तयार केले जात असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत असताना व्यक्त केले आहे. महाविकास आघाडी सरकार असे या सरकारचे नाव असून आमच्यात कोणतेच रुसवे-फुगवे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी त्यांनी आजच्या जीएसटी भवनाचे श्रेय मी अजित पवार यांना देतो. त्यांनी अप्रतिम संकल्पचित्र दाखवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज राज्य सरकारच्या नवीन जीएसटी भवनाचे भूमिपूजन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये रुसवे-फुगवे आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावर आज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
देशाच्या आर्थिक स्थितीचा मजबूत आधार महाराष्ट्र राज्य आहे. मात्र केवळ महाराष्ट्र राज्य आधार आहे, असे म्हणून चालणार नाही. ते आम्ही करून दाखवलं आहे. जर महाराष्ट्राचे योगदान बाजूला ठेवले तर कदाचित देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागू शकतो, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.