मुंबई : प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रखडला होता. यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन सुद्धा केले होते. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला महागाई भत्ता राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.
मध्यंतरी एसटी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के महागाई भत्ता जाहीर करण्यात आला होता. मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली होती. तेव्हापासून एसटी कर्मचारी महागाई भत्ता वाढीच्या अध्यादेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य शासनाने हा महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच सरकारी अध्यादेश निघणार असून एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या 42 टक्के महागाई भत्त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्या मुळे ऑक्टोबर महिन्याच्या पगारातच कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता जमा होईल अशी माहिती मिळत आहे. नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना आनंद देणारी ही बातमी आहे.