मुंबई : प्रतिनिधी
दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. आज शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीत कोरोना संकट काळात काही घटकांना मदत देण्याचा सल्ला दिला आहे. प्रामुख्याने हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांना मदत करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.
मागील महिन्यात शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर शरद पवार हे त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी विश्रांती घेत होते. आजपासून ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केले. त्यामध्ये पवार हे आपले स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांना सूचना करताना दिसत आहेत.
कामकाजाला सुरुवात केल्यानंतर शरद पवार यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी कोरोनाच्या संकट काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच केंद्र सरकारने पर्यटन व्यवसायासाठी जाहीर केलेल्या योजनेच्या धर्तीवर राज्यातही उद्योग व्यवसायाला संजीवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी योजना राबावण्याची सूचना केली आहे.
‘कोरोना जागतिक महामारीच्या दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्यानं पुनश्च संचारबंदीचा निर्णय़ राज्य सरकारला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून, हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत मला अवगत केले. त्यांनी प्रामुख्याने मांडलेल्या काही मागण्यांकडे आज राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले’, अशी माहिती शरद पवार यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.