नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काही दिवसांपासून खाद्यतेल आणि इंधनाच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता आठशेहून अधिक औषधांच्या किमती १० टक्क्यांनी वाढणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून या किमती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
या औषधांमध्ये पॅरासिटामॉल, ताप, हृदयविकार, उच्च रक्तदाब, अमोनिया आणि त्वचाविकारांवर उपचाराकरता वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश आहे. तर मेट्रोनिडाझॉल, फिनाइटोन सोडियम, पेनकिलर यांसारख्या औषधांच्या किमतीही वाढणार आहेत.
नॅशनल फार्मा प्राईसिंग अथोरिटीकडून शेडुल्ड किमतीमध्ये १०.७ टक्क्यांनी वाढ करण्यासाठी परवानगी दिली आहे. औषधांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असून सरकारच्या परवानगीशिवाय या औषधांचे दर वाढवता येत नाहीत.