मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह अनेक ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी सुरू आहेत. आपणही एक धाड टाकावी म्हणून आजची पत्रकार परिषद घेत असल्याचे सांगत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधतांना भाजपसह केंद्रीय सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडीवर आरोप केले आहेत. ईडीकडून चालू असलेली वसुली आजवरचा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ते यासंदर्भात चौकशी करणार आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून विविध मार्गाने वसुली करण्याचे काम चालू आहे. त्यांच्याकडून अनेक बिल्डर्स आणि व्यावसायिकांना धमकावले जात आहे. अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांवर अनेक कंपन्यांकडून कोट्यावधी रुपये ट्रान्सफर झालेले आहेत. हा वसुलीचा घोटाळा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. याबाबत आपण पुरावा देणार आहोत. आयकर विभागाला ५० पत्रे पाठवली. परंतु या पत्रांची दखल घेतली जात नाही. मी एक खासदार असताना देखील पत्रांची दखल घेतली जात नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
चार ईडीच्या आधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आजपासून मुंबई पोलिस त्यांची चौकशी करणार आहेत. यामध्ये अनेक अधिकारी जेलमध्ये जाणार आहेत. यांच्यासोबत भाजपाचे अनेक नेतेही असणार आहेत. ईडीच्या वसुली घोटाळ्याप्रकरणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २८ पानी पत्र लिहिलं आहे. याबाबतची सर्व माहिती पंतप्रधानांना दिली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.