बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील एका शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पैशांच्या हव्यासापोटी शासकीय नियमांची पायमल्ली चालवल्याचे समोर आले आहे. या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे भलतेच उद्योग चालत असल्याने खळबळ उडाली आहे.
शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना बारामतीत मोठ्या सुविधा असतानादेखील पैशाचा मोह का पडतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. बारामतीतील एका शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सातत्याने बाहेरगावी जाऊन खाजगी ठिकाणच्या शिबिरामध्ये भाग घेतो व शास्त्रीय करतो अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून या उद्योगांची चर्चा सुरू होती, मात्र यासंदर्भात नगर जिल्ह्यातील शिबिरात शस्त्रक्रिया करतानाचे फोटोच आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याचे भांडे फुटले आहे.
यासंदर्भात बारामती वैद्यकीय रुग्णालयाचे शासकीय महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही गंभीर बाब असल्याचे मान्य केले. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया सरकारी वैद्यकीय अधिकार्याला बाहेरगावी जाऊन करता येत नाहीत असे सांगून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.