मुंबई : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशसह अन्य राज्यातील बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन बँकांचा समावेश आहे.
काल देशातील एकूण आठ को-ऑपरेटिव्ह बँकांना आरबीआयकडून दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ४० लाखांचा दंड, छत्तीसगड राज्य सहकारी बँक मर्यादित, रायपूर २५ लाखांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत, छिंदवाडा आणि गन्हा को-ऑपरेटिव्ह बँक यांना एक-एक लाखांचा दंड, तर द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक, पणजी येथील बँकेवर २.५१ लाखांची आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयनं अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर केवायसीप्रकरणी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ३.५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेनं आरबीआयनं सहकारी बँकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि केवायसीप्रकरणी १ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बँकांकडून नियमांचे पालन न केल्यास रिझर्व्ह बँक दंड आकारत असते.
यापूर्वी जुलै महिन्यात द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बँकावर आरबीआयनं कारवाई केली होती. यावेळी रिझर्व्ह बँकेने या कारवाई संदर्भात एक निवेदन जारी केले होते. तसेच यात आरबीआयने म्हटलं होतं की, मुंबईतील ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँके’ने फसवणूक आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या नाबार्ड निर्देशांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बँकेला ३७.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.