नवी दिल्ली : प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. जवळपास दिड तास झालेल्या या चर्चेत राज्यातील विविध समस्या पंतप्रधानांसमोर मांडण्यात आल्या. या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा आमदारांच्या नियुक्तीचा विषय राज्यपालांकडून प्रलंबित असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बारा आमदारांच्या नियुक्त्या रखडवल्याची बाब मांडली. महाविकास आघाडी सरकारने संबंधित आमदारांची यादी पाठवूनही त्याबाबत निर्णय झालेला नाही. विशेष म्हणजे याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्याचे ना. अजित पवार यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.
एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यामुळे विविध अंदाज व्यक्त केले जात असतानाच अजितदादांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यपालांच्या भूमिकेबाबत विषय मांडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.