नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या पेगासस प्रकरणी महत्त्वाचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तज्ञांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात याबद्दल आदेश देण्यात येतील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय घेतला आहे .
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी ज्येष्ठ वकील सी. यू सिंग यांना पेगासस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करा, असे आदेश दिले आहेत. ही समिती या आठवड्यात स्थापन करा असेही त्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने देशातील काही पत्रकार व राजकारणातील लोकांची हेराफेरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टवेअरचा वापर केला आहे का ? या चौकशीसाठी विशेष तज्ञांची एक स्वतंत्र समिती स्थापन केली जावी असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
याच प्रकरणावर यापूर्वी झालेल्या न्यायालयीन सुनावणीमध्ये सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, सरकार या प्रकरणात कुठली जोखीम पत्करू शकत नाही . राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी सरकारवर आहे. असे केल्यास राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचेल. प्रत्येक नागरिकांचे खाजगी आयुष्याचे संरक्षण हे सरकारचे काम आहे, असे सांगितले होते. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्याच्या मागणीसंदर्भातील याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.