नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या तीन महिन्यात या नोटा मागे घेतल्या जाणार आहेत. ३० सप्टेंबरपूर्वी ग्राहकांना आपल्याकडील नोटा बदलून घेता येणार आहेत.
२०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीवेळी बाजारात २ हजार रुपयांची नोट आली होती. मात्र २०१८-१९ मध्येच या नोटांची छपाई बंद करण्यात आली. आज रिझर्व्ह बॅंकेने या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलून घेण्याची मुदत रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे.
नोटा बदलून घेण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकाचवेळी केवळ २० हजार रुपयेच बदलून घेता येतील असेही रिझर्व्ह बॅंकेकडून जाहीर करण्यात आले आहे. मागील काही काळात २ हजाराची नोट बंद होणार अशी चर्चा होती. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.