मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत उत्तर दिले. केंद्र सरकारने निर्णय घेतला, तर संपूर्ण देशातच हा चित्रपट करमुक्त होईल असे म्हणत त्यांनी करमुक्तीचा चेंडू थेट केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला.
मागील काही दिवसांपासून ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून वादंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन देवून करण्यात आली होती.
अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी भाजपच्या मागणीला थेट केंद्र सरकारचे दार दाखवून दिले. भाजपला जर हा चित्रपट करमुक्त व्हावा असे वाटत असेल, तर त्यांनी केंद्राकडे मागणी करावी. एकट्या महाराष्ट्रात हा चित्रपट करमुक्त करून कसं चालेल असे म्हणत अजितदादांनी करमुक्तीचा चेंडू थेट केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला. त्यामुळे आता भाजपची भूमिका काय राहणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.