कोरोना विषाणूनं जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलं. दुसऱ्या महायुद्धानंतर 2020 या वर्षात जगाच्या अर्थव्यवस्थेत वेगानं घट झालेली पाहवयास मिळाली.
कोट्यवधी लोकांच्या एकतर नोकऱ्या गेल्या किंवा उत्पन्न कमी झालं. अर्थव्यवस्थेचं होणारं नुकसान रोखण्यासाठी सरकार अब्जावधी डॉलरच्या योजना आणत आहे. अर्थव्यवस्थेचा कोसळलेला डोलारा 2021 या वर्षातही भरून निघेल का, याबाबत अनिश्चितता दिसून येतेय.प्राथमिक अंदाजानुसार, चिनी अर्थव्यवस्था मोठ्या वेगानं घोडदौड करू लागलीय. मात्र, जगातील इतर अनेक देशांना 2022 पर्यंत नुकसान भरून काढणं सुद्धा मोठं आव्हान बनलंय.असमानता देखील मोठ्या प्रमामात वाढत आहे. अमेरिकेतील 651 अब्जाधीशांची एकूण संपत्ती 30 टक्क्यांनी वाढून 4 लाख कोटी डॉलरवर पोहोचलीय.
तर दुसरीकडे, विकसनशील देशांमधील 25 कोटी लोकांना तीव्र गरिबीचा सामना करावा लागू शकतो. जगातील निम्म्या नोकरदारांना उदर्निवाहाच्या साधनं गमावून बसण्याची वेळ आलीय. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांचा जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसलाय.
कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि लशीची शर्यत अशा गोष्टी सुरू असतानाही यशाची निश्चिती नाही. भले श्रीमंत देशांनी लस मिळवलीय. मात्र, त्यांच्यासाठीही 2021 च्या अखेरपर्यंत हर्ड इम्युनिटीसाठी लोकांपर्यंत लस पोहोचवणं वाटतं तितकं शक्य नाही.विकसनशील देशांमध्ये लशीचा पुरवठा तसाही कमीच आहे. त्यामुळे अशा देशांमध्ये विषाणूचा प्रसार अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे.
चीनची अर्थव्यवस्था 2021 मध्ये 8 टक्क्यांनी वाढू शकते, असा अंदाज आहे. याचा अर्थ, कोरोनापूर्वी पाश्चिमात्य जगतातील विकसित देशांचा जो विकासदर होता, त्यापेक्षाही दुप्पट विकासदर चीनचा या चालू वर्षात असू शकतो.चीन बऱ्यापैकी निर्यातीवर अवलंबून असलेला देश आहे. पाश्चिमात्य देशांध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे चीनला बराच फायदा झाला.मनोरंजन आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रातही पाश्चिमात्य देशांना फटका बसला असला, तरी घरातील साहित्य आणि वैद्यकीय साहित्य यांमध्ये मात्र पाश्चिमात्य देश आघाडीवर आहेत.मात्र, हे सर्व असलं तरी पूर्ण आशिया खंडात चीननं आपला आर्थिक दबदबा नक्कीच वाढवला आहे.पॅसिफिकमधील नवी फ्री ट्रेड आणि युरोपपासून आफ्रिकेपर्यंत ट्रेड रुट्सच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट यांद्वारे चीन आपला दबदबा आणखी वाढवत आहे. सेमीकंडक्टरसारख्या गोष्टींसाठी चीन पाश्चिमात्य देशांवर अवलंबून असे. मात्र, आता चीननं अॅडव्हान्स टेक्नोलॉजीच्या माध्यमातून यातही स्वावलंबी बनत गुंतवणूक करायला सुरुवात केलीय.पुढच्या पाच वर्षांत चीन जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था ठरेल आणि यात चीन अमेरिकेलाही मागे टाकेल. आधीच्या अंदाजानुसार, चीन आता दुप्पट वेगानं सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल.
अमेरिका, ब्रिटन आणि काँटिनेंटल युरोपमधील श्रीमंत देश यांची स्थिती फार वाईट दिसतेय. 2020 या वर्षातील उन्हाळ्यात थोड्याफार भरपाईनंतर या देशांच्या अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हा चिखळात रुतली आहेत. कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊन ही त्याची प्रमुख कारणं आहेत.
उदाहरणच सांगायचं तर, अमेरिकेत कोरोनामुळे नोकऱ्या आणि विकासदरावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे तेथील व्यवसाय आणि ग्राहकांमधील विश्वास कमी झाला. पुढच्या वर्षी यात काही भरून निघेल, अशी आशा असली तरीही 2022 मध्ये या देशांच्या अर्थव्यवस्थाची स्थिती सर्वसामान्य स्थितीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी आक्रासण्याचीच शक्यता आहे.2021 मध्ये विकसनशील देशांना सर्वात मोठं नुकसान सहन करावं लागण्याची भीती आहे. बऱ्याच विकसनशील देशांकडे लस खरेदी करण्यासाठी वित्तीय स्रोत सुद्धा नाहीत आणि त्यांची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुद्धा अशी नाही की, संसर्ग झालेल्या लोकांवर उपचार करू शकतील.हे विकसनशील देश मोठ्या प्रमाणात अनुदानही देऊ शकत नाहीत. युरोप आणि अमिरेकेनं तसं केलंय. मात्र, हे विकसनशील देशात शक्य नाही.पाश्चिमात्य देशांमधील मंदीमुळे विकसनशील देशांमधील कच्च्या मालाची मागणी कमी होईल. तसंच, श्रीमंत देशांकडून मोठं कर्ज न मिळाल्याने लॉकडाऊनही वाढवलं जाणार नाही. याचा परिणाम अर्थातच कोरोनाच्या प्रसारात होईल.