नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोव्हीशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटने आता रशियाच्या स्पुतनिक वी या लसीची निर्मिती करण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत केंद्र सरकारकडे टेस्ट लायसन्स मागितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात या लसीची उपलब्धता वाढणार आहे.
सध्या भारतामध्ये डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीमार्फत स्पुतनिक लस बनवली जात आहे. आता सिरम इन्स्टिट्यूटनेही ही लस बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे टेस्ट लायसन्स मागितले आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर काही दिवसातच या लसीचे उत्पादन सुरू केले जाणार आहे.
दरम्यान, देशात स्पुतनिक लसीचा पुरवठा सुरू झाला असून बुधवारी हैदराबाद येथे 30 हजार डोस प्राप्त झाले आहेत. त्यातच भारतातही या लसीचे उत्पादन घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही काळात भारतात मोठ्या प्रमाणात ही लस उपलब्ध होणार आहे.