मुंबई : प्रतिनिधी
ऐन दिवाळीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच आणि दहा रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून चांगली टीका होत आहे. आधी १०० रुपयांनी दर वाढवायचे आणि नंतर त्यामध्ये पाच-दहा रुपये कमी करायचे ही केंद्र शासनाची खेळी आहे. जर पेट्रोलचे दर ५० रुपयांनी स्वस्त करायचे असतील तर देशभरामध्ये भाजपाचा पराभव करावा लागेल, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राने पेट्रोलचे भाव वाढवून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. सरकारने इंधनाच्या दरामध्ये वाढ करून बेहिशोबी मालमत्ता कमावलेली आहे असे सांगून संजय राऊत यांनी पेट्रोलचा दर पाच रुपये कमी करून काय होणार आहे ? असा सवाल उपस्थित केला. केंद्राचे मन मोठे नाहीतर सडके आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की , सणासुदीचे दिवस चालू आहेत. आगोदरच महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. सणापूर्वीच पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, किराणा मालाचे दर कमी करायला हवे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जनतेला लुटण्याची वृत्तीच भाजपने दाखवून दिली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने एक-दोन रुपयांमध्ये रुपये इंधनाच्या दरांमध्ये कपात केली आहे. सरकारने या दरांमध्ये निर्णय चांगल्या मनाने घेतलेला नसून कपात करण्याचा निर्णय भीतीपोटी घेतलेला आहे. मात्र जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनता तुम्हा धडा शिकवेल, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.