मणिपूरमध्ये पाच जागा तर उत्तरप्रदेश व गोवा राज्यात राष्ट्रवादी आघाडी करुन लढणार; उत्तरप्रदेश व गोव्यात चर्चा सुरू…
मुंबई : प्रतिनिधी
देशातील पाच राज्यात निवडणूका जाहीर करण्यात आल्या असून यापैकी मणीपूर, गोवा आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूका लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या तिन्ही राज्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि छोट्यामोठ्या पक्षांना बरोबर घेऊन आघाडीने लढणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
मणीपूरमध्ये राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत. त्यामुळे यावेळी पाच जागा राष्ट्रवादी लढणार आहे. तर गोव्यामध्ये कॉंग्रेस,तृणमूल व इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. तर उत्तरप्रदेशमध्ये पुढच्या आठवड्यात स्वतः जाणार असून उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांची आघाडी झाली आहे. उद्या लखनऊमध्ये या सर्व पक्षांची बैठक होणार असून त्या बैठकीत जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल असेही शरद पवार म्हणाले. उत्तरप्रदेशमध्ये लोकांना बदल हवा आहे त्यामुळे तिथे परिवर्तन होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
आमच्या बाजुने ८० टक्के लोक आहेत. तर २० टक्के लोक नाहीत असे विधान उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री हा सर्वांचा असतो. २० टक्के लोक बाजुने नाहीत हे विधान अल्पसंख्याक समाजातील लोकांच्या भावनांना छेद देणारे आहे. अशा प्रकारचे विधान मुख्यमंत्रीपदाला शोभा देणारे नाही. पण त्यांच्या जे मनात आहे, ते त्यांच्या ओठावर आले आहे. यातून एक गोष्ट सिद्ध होते की, देशात एकता आणि सहिष्णुता टिकवायची असेल तर अशाप्रकारचे सांप्रदायिक विचार वाढणे योग्य नाही. याविरोधात उत्तरप्रदेशची जनता नक्कीच कौल देईल आणि राज्यात परिवर्तन घडवेल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
गोव्यात भाजपचे सरकार हटवण्याची गरज आहे आणि तसे एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे अशी आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाकडून प्रफुल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत व कॉंग्रेसचे नेते अशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, आज उत्तरप्रदेशमधील कॉंग्रेसचे अल्पसंख्याक नेते सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत शरद पवार यांनी केले. आज उत्तरप्रदेशच्या स्थितीमध्ये खूप बदल झाला आहे. मला आनंद आहे की, जे उत्तरप्रदेशच्या विधानपरिषदेचे सदस्य होते. मागच्या अनेक वर्षांपासून गांधी-नेहरू यांच्या विचारधारेवर काम केले आहे. काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वांना सोबत घेऊन उत्तरप्रदेशमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन एक अल्टरनेटीव्ह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिराज मेहंदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत याचा मला आनंद होत आहे. उत्तरप्रदेशच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे सहकारी आहेत.मी देखील उत्तरप्रदेशमध्ये जाऊन त्यांच्यासोबत एक जाहीर सभा घेणार आहे असेही शरद पवार यांनी जाहीर केले.
आज उत्तरप्रदेशचे मंत्री मौर्या यांनी मंत्रिपदाचा तसेच भाजपचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षाची कास धरली आहे. त्यांच्यासोबत काही आमदारही पक्ष सोडणार असल्याचे कळते त्यामुळे उत्तरप्रदेशमध्ये यावेळी परिवर्तन होणार आहे असे ठाम मत शरद पवार यांनी व्यक्त केले
उत्तरप्रदेशच्या जनतेला जी आश्वासने देण्यात आली होती. त्यात सत्यता नाही, त्यामुळे अनेक लोक भाजप सोडून परिवर्तन घडवण्यासाठी येत आहेत हे आता लोकांना कळले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या प्रकरणाबाबत कालच सुप्रीम कोर्टाने एक स्वतंत्र चौकशी समिती नेमली आहे. त्यातून वास्तव काय असेल ते समोर येईल. मला वाटतं, पंतप्रधानपद हे एक इन्स्टिट्यूशन आहे. त्यासाठी केंद्र असेल किंवा राज्याने सुरक्षेची जबाबदारी घेतलीच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने समिती स्थापन केली असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही असेही शरद पवार म्हणाले.
या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्षा सोनिया दुहन, सिराज मेहंदी आदी उपस्थित होते.