बारामती : प्रतिनिधी
दागिन्यांवरील हॉलमार्क आणि युनिक आयडी धोरणाला बारामती सराफ असोसिएशनचा विरोध आहे. परंतु त्यावर बंद पाळणे हा पर्याय नाही. या संदर्भात सरकारने वेळोवेळी चर्चेची दारे उघडी ठेवली असून इंडियन बुलियन असोसिएशनच्या मागण्यांबाबत सरकार अनुकूल आहे. त्यामुळे या संदर्भात सोमवारी (दि. २३) पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये बारामती सराफ असोसिएशन सहभागी होणार नाही, अशी माहिती बारामतीतील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक किशोरकुमार शहा आणि इंडियन बुलियन असोसिएशनचे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली.
सरकारने नुकताच २५६ जिल्ह्यात हॉलमार्क कायदा अस्तीत्वात आणला आहे. देशात अद्याप नवीन ३५६ नवीन हॉलमार्क सेंटर उभे करायचे आहेत. हॉलमार्क सेंटर कमी असल्याने देशभरात सराफ व्यावसायिकांना हॉलमार्क कायद्याची अमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यातच युनिक आयडी सुरू केल्यास अनेक अडचणी निर्माण होणार आहेत.
हॉलमार्क कायदा सर्वानी मान्य केला आहे. मात्र त्यासाठी आवश्यक केंद्रे सुरू झालेली नाहीत. त्यातच युनिक आयडी सक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या या धोरणाला बारामती सराफ असोसिएशनचा विरोध आहे. असे असले तरी बंद पाळून व्यावसायिकांचे नुकसान करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सोमवारी पुकारलेल्या बंदमध्ये बारामती सराफ असोसिएशन सहभागी होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सराफ व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. त्यातच पुन्हा कोरोनाची लाट आल्यास लॉकडाऊनची भीती आहे. या परिस्थितीत नियमीत खर्च, व्यवस्थापनावरील खर्च सुरूच राहतात. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दुकाने बंद ठेवणे परवडणारे नाही. या पार्श्वभूमीवर बारामती सराफ असोसिएशनच्या अंतर्गत येणाऱ्या तालुक्यांसह इतर जिल्ह्यातील सभासदही या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत असे किरण आळंदीकर आणि किशोरकुमार शहा यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांची भेट घेणार
काही वर्षांपूर्वी देशभरातील सराफ व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने अबकारी कर लावला होता, त्यावेळी बारामती सराफ असोसिएशन सह राज्यातील सराफांचे शिष्टमंडळ मा.केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटले होते. त्यावेळी शरद पवारांच्या मध्यस्थीने सराफांच्या प्रश्नावर तोडगा निघाला होता. या वेळी देखील सराफांच्या प्रश्नावर आपण शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.