बारामती : प्रतिनिधी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. भाजप नेते या अर्थसंकल्पाचे समर्थन करत आहे तर विरोधक टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या अर्थसंकल्पावरून सरकारवर निशाणा साधला आहे. बारामतीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
दरवर्षी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले जाते. मात्र ते पूर्ण होत नाही यंदाच्या अर्थसंकल्पात काही क्षेत्रात जास्त प्रमाणात निधी देऊन रोजगाराचे आश्वासन दिले आहे. पण मागील काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी रोजगार उपलब्ध करून दिले जातील यावर विश्वास ठेवणे अवघड बनले आहे, असे मत शरद पवार यांनी मांडले आहे.
आपला देश हा कृषिप्रधान देश असून उत्पादन वाढविण्यासाठी गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी खूप कष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देश उत्पादनाच्या बाबतीत चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचला आहे. या क्षेत्राला चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक करण्याची भूमिका केंद्राने घ्यायला हवी होती असे मत शरद पवार यांनी नोंदवले.
या अर्थसंकल्पात सिंचनाशी निगडित काही तरतूदी केल्या आहेत. मात्र ज्या तरतुदींची सरकारकडून अपेक्षा होती, त्याची पूर्तता अर्थसंकल्पातून झाली नाही. कृषी क्षेत्राशी संबंधीत सर्वांच्या प्रतिक्रिया निराशाजनक असल्याचेही शरद पवार यांनी नमूद केले.