
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यपद्धत सर्वश्रुत आहे. पहाटे सहा वाजल्यापासून त्यांच्या कामाचा झपाटा सुरु होतो ते रात्री उशीरापर्यंत.. मात्र वेळ काळ न पाहता अजितदादा विकासकामांवर बारकाईने लक्ष देतात हेही अनेकदा पहायला मिळते. त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
शनिवारी दिवसभर बारामती आणि परिसरात अजितदादांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. आज सातारा दौरा असल्याने ते काल बारामतीतच मुक्कामी होते. त्यामुळे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अजितदादांनी आपल्या चालकांसमवेत बारामती शहरातून फेरफटका मारत विकासकामांची पाहणी केली.
बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या परिसरात सुरु असलेल्या कामांची अजितदादांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यानचा एक व्हिडीओ आता सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल होत आहे. रात्रीच्या अंधारातही विकासकामांवर करडी नजर ठेवत विकासकामांबद्दलची अजितदादांमध्ये असणारी आत्मियता या निमित्ताने दिसून आली.
तुम्ही मतांच्या रुपात माझ्यावर ओझे टाकले आहे. त्यामुळे अधिकाधिक विकासकामे आणि सुविधा उपलब्ध करण्यासाठी रात्रंदिवस झटणे हे माझे कर्तव्य आहे असे अजितदादांनी अनेकदा भाषणांतून सांगितले आहे. त्याचीच प्रचिती या व्हिडीओच्या निमित्ताने आली. त्याचवेळी अजितदादांच्या याच कर्तव्यदक्ष कार्यपद्धतीमुळे बारामतीकर लाखोंच्या मताधिक्याने निवडून देतात हेही या निमित्ताने स्पष्ट झाले.