बारामती : प्रतिनिधी
बारामतीत स्थानिक संस्थांसह पवार कुटुंबियांच्या माध्यमातून शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यामुळे मागील काही काळात बारामती हे एज्युकेशनल हब बनले. परंतु गेल्या काही वर्षांपासून बारामतीत बेकायदेशीर अकॅडमींचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने या अकॅडमी चालकांचं फावत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दलही आता संताप व्यक्त होत आहे.
बारामती शहर आणि परिसरात अनेक दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. मात्र मागील काही वर्षात ‘अकॅडमी’ नावाचं प्रस्थ बारामतीत वाढल्याचं पहायला मिळत आहे. बेकायदेशीरपणे या अकॅडमींकडून वाटेल तशी फी आकारणी केली जात आहे. त्याचवेळी बाहेरील संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखवून त्यांच्या भविष्याचीही वाट लावली जात असल्याचं समोर आले आहे.
विशेष म्हणजे या अकॅडमींकडून अवास्तव फी वसूल केली जात असून वेळ पडल्यास पालकांची अडवणूक होत असल्याचेही समोर आले आहे. बारामतीतील बहुतांश अकॅडमींनी शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता मनमानी कारभार सुरू केला आहे. मात्र याबद्दल तक्रारी केल्यानंतरही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अकॅडमींबद्दल ईडीकडेही तक्रार
बारामतीत सुरू असलेल्या या अकॅडमींबद्दल शासनाच्या विविध खात्यांसह ईडीकडेही तक्रारी झाल्या आहेत. वर्षाकाठी लाखो रुपये फी आकारली जाते. त्याबद्दल कोणतेही नियंत्रण या अकॅडमींवर नाही. त्यामुळे या सगळ्या कारभाराबाबत ईडीकडेही तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या अकॅडमींकडून शासनाच्या अनेक नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याची बाबही समोर आली आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
फायर ऑडिटबद्दल नगरपालिकेच्या नोटीसा बासनात..?
या अकॅडमींना मध्यंतरी बारामती नगरपरिषदेकडून फायर ऑडिट करण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. मात्र त्यांच्याकडून या नोटीसांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतरही नगरपरिषदेने कोणतीही कारवाई केली नसल्याचे तक्रारदार मोहसीन पठाण यांनी सांगितले. याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे येत्या ११ जुलैपासून बारामती नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अधिकाऱ्यांच्या भूमिका संशयास्पद..!
या सर्व अकॅडमीबाबत विविध विभांगांकडे तक्रारी केल्या. परंतु कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे मोहसीन पठाण यांनी सांगितले. या अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही समोर आले आहे.