
बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत केलेल्या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीत राष्ट्रवादीच्या वतीने उद्या शनिवारी सकाळी निषेध आंदोलन केले जाणार आहे.
शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. या दरम्यान, काहींनी पवार यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत चप्पल फेकल्याचा तसेच दगडफेक केल्याचा प्रकारही घडला आहे. या भ्याड हल्ल्याच्या मास्टरमाईंडचा शोध घेवून त्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी बारामती शहर पोलिस ठाण्यासमोर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार असून या संदर्भातील मागणीचे निवेदन पोलिस प्रशासनाला दिले जाणार आहे. या आंदोलनात अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर यांनी केले आहे.