बारामती : प्रतिनिधी
बारामती सराफ असोसिएशनच्या माध्यमातून उद्या शनिवारी दि. १६ सप्टेंबर रोजी सराफ व्यावसायिकांसाठी विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सराफ व्यवसायासंदर्भातील नवीन कायद्यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयबीजेएचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किरण आळंदीकर यांनी दिली.
बारामती शहरातील बारामती क्लब येथे हे चर्चासत्र होणार आहे. यामध्ये आयबीजेएचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तर आयबीजेएचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हरेश केवलरामाणी, संचालक विजय लष्करे, विजय अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या चर्चासत्रामध्ये सराफ व्यवसायात झालेले बदल, केंद्र सरकारचे नवीन कायदे आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
याच चर्चासत्रादरम्यान, पोलिस अधिकारी आणि सराफ व्यावसायिक यांच्या परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, साताऱ्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे, तालुक्याचे प्रभाकर मोरे, माळेगावचे किरण अवचर, वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे आणि सुप्याचे नागनाथ पाटील उपस्थित राहणार आहेत. या परिसंवादात कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला जाणार असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.