पुणे : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यावर कोरोनाचे भयंकर संकट पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार निधीतून तब्बल ३५० कोटी रुपयांचा निधी कोरोनावरील उपाययोजनांसाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पाडली. या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी चर्चा केली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध उपाययोजना आखण्यात आल्या असून त्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
आमदार निधीतून तब्बल ३५० कोटी रुपये कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आमदारांना त्यांच्या निधीतून एक कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.