बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथून डिसेंबर महिन्यात चोरीला गेलेला जेसीबी चोरांसह शोधण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्याकडून जेसीबीही जप्त केला आहे.
सौरभ धनाजी चव्हाण ( वय २२, रा. कुरवली, ता. इंदापूर) आणि संतोष नामदेव घाडगे (वय ३३, रा. धांगवडी ता. भोर) अशी या आरोपींची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, शिर्सुफळ येथून २१ डिसेंबर २०२१ रोजी १० लाख रुपये किमतीचा जेसीबी चोरीला गेला होता. याबाबत गणेश कल्याण जाधव (रा. शेळगाव, ता. इंदापूर) यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी या चोरी प्रकरणाच्या तपासाबाबत सूचना केल्या होत्या.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलिस अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक सुधीर काळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, पोलीस नाईक अमोल नरूटे, रणजीत मुळीक यांनी याबाबत तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लागल्यानंतर दि. २८ एप्रिल रोजी या चोरट्यांना पकडण्यात आले. चोरून नेलेला जेसीबी भोर येथून जप्त करण्यात आला. सौरभ चव्हाण आणि संतोष घाडगे या दोघांनीही या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना बारामती न्यायालयाने १ मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक सुधीर काळे, अमोल नरूटे, रणजीत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, पोलीस नाईक गावडे यांनी ही कारवाई केली.