
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या दिलखुलास स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. ते आपल्या भाषणातून हलकेफुलके विनोद करत असतात. आज बारामती तालुक्यातील सुपे येथेही एका प्रसंगानं अजितदादांच्या आगळ्यावेगळ्या स्वभावाची प्रचिती करून दिली. एका कार्यकर्त्यानं पाण्याच्या कामाबाबत आपल्या गावाचं नाव नसल्याचं सांगितलं. त्यावर अजितदादांनी तुझ्या गावासाठी स्वतंत्र योजना होत असल्याचं सांगताच त्या कार्यकर्त्यानं सॉरी-सॉरी म्हणत आपली चूक मान्य केली अन काही क्षणात अजितदादांनी तू माझी प्यारी-प्यारी अशा शब्दांत उत्तर देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील सुपे येथे पाणी टंचाई, विविध विकासकामे, जानाई-शिरसाई योजना यासह विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीला उपस्थित राहून शेतकरी, ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सुपे आणि परिसरातील पाण्याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी मंजूर कामांची माहितीही दिली.
ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर उत्तरे देत त्यांनी एकूणच कामांचा आढावा घेतला. राज्य शासनाच्या माध्यमातून कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. याच दरम्यान, एका कार्यकर्त्यानं पाण्याच्या योजनेत माझ्या गावाचं नाव नाही असा मुद्दा उपस्थित केला. त्यावर तुझ्या गावासाठी स्वतंत्र योजना केली आहे आणि ६५ कोटी रुपयांची ती योजना असल्याचं अजितदादांनी सांगितलं.
आपल्या गावासाठी स्वतंत्र योजना असल्याचं समजताच संबंधित कार्यकर्त्यानं आपली चूक मान्य करत सॉरी-सॉरी म्हटलं. त्यानंतर अजितदादांनी आपल्या खास स्टाईलमध्ये तू माझी प्यारी-प्यारी असं उत्तर दिलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आज अजितदादांनी सुपे येथे शेतकरी व ग्रामस्थांनी मांडलेले अनेक महत्वपूर्ण विषय मार्गी लावले. त्याचवेळी आपली विनोदी शैली दाखवून दिल्यामुळे अजितदादांच्या आगळ्यावेगळ्या स्वभावाची प्रचितीच उपस्थितांना अनुभवण्यास मिळाली.