Site icon Aapli Baramati News

CRIME NEWS : माळेगावमध्ये गावठी पिस्तुल आणि काडतूसे विक्रीचा डाव उधळला; एकजण अटकेत..!

ह्याचा प्रसार करा

माळेगाव : प्रतिनिधी  

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये दोन गावठी पिस्तुलासह जीवंत काडतूसे विक्रीचा डाव उधळून लावण्यात माळेगाव पोलिसांना यश आले आहे. सोशल मिडियात गावठी पिस्तुलाचे फोटो व्हायरल करत विक्रीचा डाव आखणाऱ्या एका युवकाला माळेगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

आकाश सुरेश हजारे (वय २४, मूळ रा.शिंदेवाडी, ता. माळशिरस, सध्या रा. लकडेनगर, माळेगाव, ता. बारामती) याला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मिडियावर गावठी पिस्तुलाचे फोटो टाकत आकाश हा जाहिरात करत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यानुसार आकाश हा माळेगाव बुद्रुक येथील पीर बाबांच्या दर्ग्याजवळ पिस्तुलांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी दर्गा परिसरात सापळा रचून आकाशला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलासह जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आकाश हजारे याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आकाशकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांची दोन पिस्तुले आणि काडतुसे असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, ही पिस्तुले कोणाला विकणार होता याची पोलिस चौकशी करत आहेत. पोलिस उपनिरीक्षक देविदास साळवे, सहाय्यक फौजदार जयंत ताकवणे, पोलिस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, नंदकूमार गव्हाणे, जयसिंग कचरे यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version