
बारामती : प्रतिनिधी
पतीला न सांगता घराबाहेर जाणं पत्नीला चांगलंच महागात पडलं आहे. न सांगता बाहेर गेलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना बारामतीत घडली आहे. यामध्ये संबंधित विवाहितेच्या डाव्या हाताची करंगळी आणि शेजारील बोट तुटले असून डाव्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुदर्शन रणजित जाधव (सध्या रा. बयाजीनगर, रुई, बारामती, मूळ रा. किणी, ता. आष्टी, जि. बीड) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपाली सुदर्शन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. सुदर्शन व दिपाली यांचा २०११ साली त्यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही बारामतीत राहून उपजीविका करत होते.
बुधवारी दि. १० रोजी दिपाली ही आपल्या दुचाकीवरून पेन्सिल चौकात गेली होती. याबद्दल तिने आपल्या पतीला कल्पना दिली नव्हती. संध्याकाळी सुदर्शन घरी परतल्यानंतर त्याला पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे त्याने पत्नीला फोन करून चौकशी केली. त्यावर तिने आपण मॉलमध्ये सेल सुरू असल्याने खरेदीसाठी आल्याचं सांगितलं.
रात्री फिर्यादी घरी परतल्यानंतर पती सुदर्शनने तिच्याशी वाद घातला. मला न सांगता तू घराबाहेर का गेलीस असं म्हणत तिला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता घरातील कोयता हातात घेत त्याने तिच्यावर वार केले. यामध्ये तिची करंगळी व शेजारचे बोट तुटले असून डाव्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे. संबंधित महिलेवर बारामतीतील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.