
बारामती : प्रतिनिधी
हॉटेलच्या गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील सुपे येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी खूनाचा दाखल करत संबंधित हॉटेल मालकाला अटक केली आहे.
श्रीराम भदुजी गहुकार (वय ४२, रा. अंजनगाव बारी, जि. अमरावती) असे या घटनेतील मृत हॉटेल कामगाराचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मच्छिंद्र काळखैरे यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये श्रीराम गहुकार हे कामाला होते. मात्र ते गल्ल्यातून पैसे चोरत असल्याचा संशय आल्यामुळे काळखैरे याने त्यास लाकडी दांडक्याने पोटावर, बरगडीवर मारहाण केली. २ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हॉटेल श्रीकृष्णजवळ ही घटना घडली होती.
या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या श्रीराम गहुकार याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. विशाल श्रीराम गहुकार याने दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक मच्छिंद्र दत्तात्रय काळखैरे (रा. काळखैरेवाडी, ता. बारामती) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी काळखैरे याला अटक केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे करीत आहेत.