बारामती : प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडील रक्कम काढून घेऊन त्याचे नग्न व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, रविवारी ४ डिसेंबर रोजी संबंधित विद्यार्थी सुभद्रा मॉल येथे खरेदीसाथी गेला होता. तेथून तो शासकीय महाविद्यालयात जात असताना ऑक्सिजन प्लांट्च्या पूर्वेकडील भिंतीजवळ तो आला असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याला शिविगाळ, दमदाटी करत त्याच्या पॅन्टच्या खिशातील 15 हजार रुपये काढून घेतले.
याचदरम्यान, आणखी एका दुचाकीवरून दोघे आले. ‘तू याला पैसे माघारी दे असे कसे म्हणू शकतो’ असे म्हणत त्या तिघांनी या विद्यार्थ्याला शिविगाळ, मारहाण केली. त्यातील एकाने जबरदस्तीने दुचाकीवर मध्यभागी त्याला बसवले. त्याच्या पाठीमागे एक जण बसला. त्यानंतर या विद्यार्थ्याला गोरड हॉस्पिटलच्या पाठीमागील ऊसाच्या शेतात नेऊन त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकले. त्याचे नग्न फोटो काढून त्याला धमकावून त्याला सोडून देण्यात आला.
या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बारामतीत घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील काही काळात बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सक्षम अधिकारी नसल्यामुळे गुन्हेगारांचे फावत असल्याचेच या निमित्ताने पुढे आले आहे.