Site icon Aapli Baramati News

CRIME BREAKING : बारामती शहरात आढळला शस्त्रसाठा, एका गावठी पिस्तुलासह पाच तलवारी जप्त; शहर पोलिसांची कारवाई

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील वडकेनगर, आमराई येथील एका घरातून एक गावठी पिस्तूल, मॅगझिनसह पाच तलवारी मिळून आल्या आहेत. बारामती शहर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ही शस्त्रे मिळून आली असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अशा पद्धतीने कोणी शस्त्रे ठेवत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहरात अग्निशस्त्र किंवा हत्यारांचा वापर होत असल्यास त्याबद्दल गोपनीय माहिती काढण्याच्या सूचना केल्या होत्या. बारामती हे विकसित शहर असून काहीवेळा वाद-विवाद झाल्यास त्यामध्ये हत्यारे व अग्निशस्त्रांचा वापर होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली.

रविवार दि. ११ जून रोजी बारामती शहरातील आमराई परिसरातील वडकेनगर येथील नेहाल उर्फ रावण विजय दामोदरे याच्या घरात गावठी पिस्तूल आणि तलवारी ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी संबंधित घराची झाडाझडती घेण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या.  सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस हवालदार कल्याण खांडेकर, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस शिपाई अक्षय सिताप, तुषार चव्हाण, दशरथ इंगवले, पोलीस हवालदार शिंदे , जामदार यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली.

पोलिसांच्या तपासणीत दामोदरे याच्या घरामध्ये एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतुस आणि पाच धारदार तलवारी मिळून आल्या आहेत. पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, २७ व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, संबंधित आरोपीने पिस्तुलचा वापर कुठे केला आहे का याची चौकशी पोलिस करत आहेत. तसेच त्याने ही शस्त्रे स्वत:जवळ का ठेवलीत याचंही शोध घेतला जात असून शस्त्रांचा पुरवठा कुणामार्फत झाला याबद्दल माहिती घेतली जात असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे कुणी शस्त्रे बाळगत असतील तर त्याबद्दल पोलिसांना माहिती द्यावी, संबंधित माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल असेही महाडीक यांनी कळवले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version