
बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिकांमधील मोतीबिंदूच्या अधिकाधिक शस्त्रक्रिया करुन त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया भविष्यात अधिक व्यापक काम करण्याचा मानस फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. या शिबिरात मधुमेहाने त्रस्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे फोरमच्या माध्यमातून मधुमेहाबाबत काम हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या वतीने बारामतीत आयोजित मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या समारोपप्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या. ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. चंद्रकांत म्हस्के, डॉ. प्रकाश रोकडे, डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
दोन दिवस डॉ. लहाने व डॉ. पारेख यांनी ४०८ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. या सर्व रुग्णांना डॉ. लहाने यांनी सूचना दिल्या. मोतीबिंदू शिबीराच्या निमित्ताने दाखल झालेल्या तब्बल ६५ रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अतिरिक्त असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करता आली नसल्याची माहिती या प्रसंगी त्यांनी दिली.
आगामी काळात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरांची संख्या वाढविण्यासह या बाबत व्यापक काम करणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. या शिबीरासाठी अनेकांनी सहकार्याचा हात पुढे केल्याने हे शिबीर यशस्वी करु शकल्याचे सांगत त्या सर्वां प्रती सुनेत्रा पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी रागिणी पारेख यांनीही मनोगत व्यक्त केले. रुग्णांवर शस्त्रक्रिया पश्चात सर्व तपासण्या, चष्मेवाटप व उपचार मोफत केले जाणार आहेत.
या शिबीरात सुनेत्रा पवार यांनी मोतीबिंदू निवारणाचे घेतलेले व्रत व डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांची त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा पाहून आम्ही शस्त्रक्रियेसाठी या शिबीरात आल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले.
अनोख्या स्नेहबंधाचे घडले दर्शन….
या शिबीराच्या निमित्ताने एका वयोवृध्द महिलेची व एका ज्येष्ठ पुरुषाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार होती. तपासणीपासून ते त्यांना घरी सोडेपर्यंत या महिलेचे पती व पुरुषाची पत्नी संपूर्ण वेळ त्यांची काळजी घेत त्यांच्याजवळ थांबून राहिली. उतारवयात या दोघांची आपल्या जोडीदाराप्रती घेतली जाणारी काळजी या शिबीरात चर्चेचा विषय ठरला.