बारामती : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १९ ते २२ जानेवारीदरम्यान बारामतीत मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली.
सुप्रसिध्द नेत्रचिकित्सक पदमश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, डॉ. सचिन कोकणे या शिबीरात रुग्णांवर शस्त्रक्रीया करणार आहेत. यावर्षी १९ जानेवारी रोजी रुग्णांची तपासणी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख व त्यांचे सहकारी करतील. ज्यांच्यावर शस्त्रक्रीया करायच्या आहेत त्या २० व २१ जानेवारी रोजी केल्या जातील.
या शिबीरामध्ये शस्त्रक्रीया मोफत केली जाणार आहे. तसेच नंतरच्या तपासण्या व चष्माही मोफत दिला जाणार आहे. रुग्णांच्या निवास, नाश्ता व भोजनाचीही सोय फोरमच्या वतीने केली जाणार आहे. फोरमच्या वतीने आजवर पाच हजारांहून अधिक मोफत बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्यात आल्या आहेत. यंदाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे शिबीर बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली ग्रामीण रुग्णालयात होणार आहे.
या शिबीरासाठी ज्यांना नावनोंदणी करायची आहे त्यांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात ही नोंदणी करावी. या बाबत अधिक माहितीसाठी सचिन पवार ८७८८८१९६९८ किंवा नीलेश जगताप ९६३७१६१६०० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.