आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

Big News : माळेगाव नगरपंचायतीत नेमकं चाललंय काय..? बिलाची रक्कम मिळवण्यासाठी ठेकेदारासह सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा..!

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या ठेकेदारांना गेल्या वर्षभरापासून बिलेच अदा केलेली नाहीत. त्यामुळे ठेकेदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशातच एका ठेकेदारासह सामाजिक कार्यकर्त्याने आता बिल मिळवण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे माळेगाव नगरपंचायतीत नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

माळेगाव ग्रामपंचायतीचे वर्षभरापूर्वी नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तेव्हापासून या नगरपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या स्मिता काळे या माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत. नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी होती.

माळेगाव नगरपंचायतीच्या स्थापनेपासून बिले मिळत नसल्यामुळे ठेकेदारांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. बारामती तालुक्यातील तरडोली येथील संजय शिवाजी कांबळे या ठेकेदाराने वर्षभरापूर्वी माळेगावमधील समाजमंदिर, व्यायामशाळा आणि संरक्षक भिंतीचे रंगकाम केले होते. त्याचे ७५ हजार ८९० रुपये इतके बिल नगरपंचायतीकडे थकले आहे. याबाबत संजय कांबळे यांनी दि. ७ जून २०२१ रोजी नगरपंचायतीकडे बिल जमा करून संबंधित रकमेची मागणी केली आहे. तशी पोहोचही नगरपंचायतीकडून मिळालेली आहे. मात्र वर्ष उलटूनही त्यांना बिलाची रक्कम मिळालेली नाही.

बिलाची रक्कम मिळत नसल्यामुळे ठेकेदाराने आता थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, याबाबत चंद्रकांत कदम या सामाजिक कार्यकर्त्याने पत्र दिल्यानंतर मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी बिल जमा करण्याबाबत पत्र दिले आहे. वास्तवात वर्षभरापूर्वी बिल जमा करूनही पुन्हा बिलाची मागणी करण्यात आल्यामुळे माळेगाव नगरपंचायतीत नेमकं चाललंय काय असाच सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, माळेगाव नगरपंचायतीच्या या कार्यपद्धतीमुळे ठेकेदारांमध्ये नाराजी आहे. त्यातच वारंवार पाठपुरावा करूनही  स्वत:च्या घामाचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदाराला आत्मदहनाचा पवित्रा घ्यावा लागला आहे. त्यामुळे आता तरी माळेगाव नगरपंचायतीच्या प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us