
सुपे : सचिन पवार
बारामती तालुक्यातील सुपे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. सुपे परिसरातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत पडळकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी केली.
गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर जात टीका केली होती. त्यानंतर राज्यभरात आंदोलनाद्वारे पडळकर यांचा निषेध नोंदवला जात आहे. आज सकाळी सुपे येथील बसस्थानकालगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पडळकर यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन केले. या आंदोलनात सुपे परिसरातील राष्ट्रवादीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पवार कुटुंबीयांवर बोलण्यापूर्वी पडळकर यांनी विचार करावा, आपल्या उंचीपेक्षा अधिक बोलू नये अन्यथा जशाला तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.